शेंडी–भंडारदरा येथे ‘धम्म-यात्रा 2026’ व दादासाहेब रूपवते यांची 101 वी जयंती उत्साहात साजरी

अकोले / प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील शेंडी-भंडारदरा येथे 28 फेब्रुवारी रोजी ‘धम्म-यात्रा 2026’ आणि कालकथित दादासाहेब रूपवते यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळच्या सत्रात गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले तसेच सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. का. दादासाहेब, का. प्रेमानंद व का. स्नेहजाताई रूपवते यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. पंचशील ध्वजरोहण व बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
जपान येथून आलेले भन्ते तेरासावा गुरुजी व पुणे येथील भंते नागघोष यांनी उपस्थितांना धम्म-देसना देत बौद्ध विचारांचा जागर केला. आदरणीय सुशिलाबाई दादासाहेब रूपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळचे सत्र संपन्न झाले.
दुपारच्या सत्रात शेंडी गावातील का. यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध गावांतील पारंपारिक वाद्य ताफे, महिलांची लेझीम पथके आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मुख्य धम्म सभेचे स्वागत व प्रास्ताविक उत्कर्षा रूपवते यांनी केले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. आनंद देवडेकर, आमदार डॉ. किरण लहामटे तसेच कॉ. डॉ. अजित नवले यांनी आपल्या भाषणातून सामाजिक परिवर्तन, बौद्ध धम्म आणि दादासाहेब रूपवते यांच्या कार्याचा आढावा घेतला. एड. संघराज रुपवते यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
यावेळी समाजाप्रती उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी मा. बाबुराव निकाळे, मा. बन्सीभाऊ त्रिभुवन, मा. आर. एस. अभंग आणि मा. सुरेश रोकडे यांना दादासाहेब रूपवते यांच्या नावाने ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
मा. पोपटराव सोनवणे व मा. विनय घोसाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलीप भांगरे, विजय वाकचौरे, विनय सावंत, एम.डी. सोनवणे, सुधाकर देशमुख, सुरेश कोते, वी.एम. बैचे, हौसाबाई जगधने, अनुराधा आहेर, अजीज वोहरा, वैभव मोकळ, रविंद्र पवार यांच्यासह धम्मयात्रा ग्रामीण व मुंबई कमिटीचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेतले. बहुजन शिक्षण संघ, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते तसेच अकोले, संगमनेर, नाशिक, नगर, इगतपुरी व पुणे येथून मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!