अल्पवयीन विद्यार्थिनीवरील ऍसिड हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; शिवसेनेकडून(उ बा ठा) पोलिसांकडे निवेदन”

संगमनेर प्रतिनिधी :

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करत निवेदन देण्यात आले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन पाराजी कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन संगमनेर येथील पोलिस उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वडगाव पान येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका नराधम युवकाने ऍसिड फेकून अमानुष हल्ला केला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

सदर विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्या आयुष्यावर कायमस्वरूपी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच, पीडित विद्यार्थिनीला तातडीने योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत आणि तिच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना व संलग्न संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून, प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या वतीने करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!