प. पु.गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात भक्तीचा महासागर; एकादशीनिमित्त हजारोंनी घेतला महाप्रसादाचा लाभ

संगमनेर

परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गुंजाळवाडी येथे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचे अद्वितीय दर्शन घडत आहे. सप्ताहाचा आज चौथा दिवस असून परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. पहाटेपासूनच हजारो भाविक सप्ताहस्थळी दाखल होत असून  अखंड हरिनाम, कीर्तन, प्रवचन आणि रामायण कथेचा रसास्वाद घेत आध्यात्मिक आनंदाचा लाभ घेत आहेत.

गेल्या तीन दिवसांत लाखो भाविकांनी आमटी भाकर खीर या  महाप्रसादाचा लाभ घेतला असून सप्ताहाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सप्ताहातील अखंड नामस्मरण, हरिकीर्तन, धार्मिक प्रवचने आणि रामायण कथा हे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. विविध भागांतून येणारे भाविक भक्तिभावाने या कार्यक्रमात सहभागी होत असल्याने संपूर्ण परिसर “रामकृष्ण हरी” आणि “गगनगिरी महाराज की जय” च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

आज एकादशीच्या निमित्ताने विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी खिचडी व केळीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद व्यवस्थापनासाठी सुमारे ३०० कर्मचारी, आचारी व हजारो स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. भाविकांना वेळेत व सुयोग्य पद्धतीने महाप्रसाद मिळावा यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे.

या सप्ताहात अनेक दानशूर भाविक अन्नदानाचे पुण्यकार्य करत आहेत. तसेच महाप्रसाद वाढण्याचे कार्य गुंजाळवाडी व तालुक्यातील तरुण-तरुणी, ग्रामस्थ आणि भक्तगण अत्यंत सेवाभावाने पार पाडत आहेत. त्यांच्या योगदानामुळे सप्ताहाची व्यवस्था अधिक प्रभावीपणे सुरू आहे.

भक्ती, सेवा आणि समाजएकतेचा सुंदर संगम ठरत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा आनंद अधिकाधिक भाविकांनी घ्यावा, असे आवाहन परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्ताने गुंजाळवाडी नगरीत सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!