▪️शक्ती, ज्ञान आणि संस्कार पुढील पिढीकडे हस्तांतरित करा: इंद्रजीत देशमुख
नातेसंबंधात अनन्य साधारण महत्त्व
सप्ताहात प्रेरणादायी व्याख्यान

संगमनेर

यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या धडपडीत माणूस स्वतःचे आरोग्य, नातेसंबंध आणि आनंद हरवून बसतो. एव्हरेस्टसारखी यशाची शिखरे सर केली तरी आयुष्याच्या प्रवासात माणूस एकटा राहता कामा नये. यशाबरोबर आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे असे प्रतिपादन निवृत्त आयएएस अधिकारी व नाम फाऊंडेशनचे व्याख्याते इंद्रजीत देशमुख (काका) यांनी केले.
पूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पाटणकर यांच्या हस्ते इंद्रजीत देशमुख यांचे स्वागत करण्यात आले. ईश्वरनिष्ठ संतांच्या मांदियाळीत सप्ताहाची सुरुवात होत असल्याचे सांगत त्यांनी संत परंपरेचे समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
मानवी जीवनातील चार आश्रम व्यवस्थेचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी माणूस दीर्घायुषी होता कारण त्याचे जीवन निसर्गाशी सुसंगत होते. निसर्गाने निर्माण केलेल्या व्यवस्थेचा आदर करून जीवन जगणे आवश्यक आहे. मानवाच्या अंगी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता दडलेल्या असून त्या ओळखून विकसित करण्याची गरज आहे. आज आपण समृद्ध झालो आहोत; मात्र मिळवलेली शक्ती, ज्ञान आणि संस्कार पुढील पिढीकडे हस्तांतरित करणे हेच खरे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
संतांनी समाजात चांगुलपणा रुजावा म्हणून सप्ताह, पारायण आणि कीर्तनाची परंपरा निर्माण केली. पारायणामुळे मनुष्य अंतर्बाह्य पवित्र होतो, तर ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलींचा ज्ञानस्पर्श असल्याचे त्यांनी सांगितले. संत मंडळींनी समाजाला ज्ञानरूपी यज्ञाकडे नेण्याचे काम केले असून संत हे संसाराला शीतल सावली देणारे वटवृक्ष असल्याचेही ते म्हणाले.
जीवनातील यशस्वी संसाराची सूत्रे उलगडताना त्यांनी उत्तम आरोग्य हा माणसाचा सर्वात मौल्यवान दागिना असल्याचे सांगितले. धन शुद्ध मार्गाने आणि उत्तम व्यवहाराने मिळविलेले असावे, घरात अवदसा नसावी, पत्नी प्रेमळ व गोड बोलणारी असावी, पुत्र आज्ञाधारक व कर्तृत्ववान असावा आणि वडीलही त्या योग्यतेचे असावेत असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या क्षेत्रात कार्य करतो त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान असणे अत्यावश्यक असल्याचेही आवर्जून सांगितले.
आजचा माणूस पैसा, लौकिक, आनंद आणि सुखाच्या शोधात धावत असताना शरीरस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत व्यक्त करून त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा दाखला दिला. यश मिळविणे महत्त्वाचे आहेच, पण त्या यशाचा आनंद घेता आला पाहिजे. आयुष्याचा प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगता आला पाहिजे असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी ग्रामस्थ, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!