अधिकमासात रामकथा श्रवणाची संधी अत्यंत दुर्मिळ असून ती कोणत्याही परिस्थितीत दवडू नये

रामनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला
रामजन्माने गुंजाळवाडी आनंदली

संगमनेर (प्रतिनिधी)

अधिकमासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रसाळ, ओजस्वी आणि भावस्पर्शी रामकथेमुळे भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली. रामकथेचा आध्यात्मिक गूढार्थ, भक्ती, ज्ञान, कर्म आणि शरणागती यांचा सुंदर संगम उलगडत महाराजांनी उपस्थित भाविकांना अधिक मासातील आठव्या पर्वातील दुसऱ्या भागामध्ये राम जन्माच्या आणि रामनामाच्या अखंड चिंतनात रंगवून टाकले.
स्व. जयवंतराव व श्री बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ मळा गुंजाळवाडी येथे राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी राम कथेतून हजारो भक्तगणांना राम कथेचा प्रत्यक्ष अनुभव अनुभवास मिळाला.
रामकथा ही केवळ एका स्थळापुरती मर्यादित नसून संपूर्ण भारतवर्षाच्या आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य ठेवा असल्याचे सांगताना महाराजांनी चार पवित्र क्षेत्रांचा उल्लेख केला. प्रयागक्षेत्री याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाजांना, कैलासक्षेत्री भगवान शंकर पार्वतीमातेला, नीलगिरी क्षेत्रात काकवशुंडी गरुडाला तर गोस्वामी तुलसीदासांनी शरणागतीचा स्वांत सुखाय आपल्या मनाला या कथेचे निरूपण संदेश देत ही दिव्य कथा मानवजातीसमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले. रामायणातील पात्रांचे आध्यात्मिक स्वरूप स्पष्ट करताना महाराज म्हणाले, दशरथ म्हणजे वेद, कौसल्या म्हणजे ज्ञानशक्ती, सुमित्रा उपासना तर कैकयी क्रियाशक्तीचे प्रतीक आहे. भगवंताचे कार्य घडवून आणणारी शक्ती म्हणजे क्रियाशक्ती. रामकथेचा भावार्थ समजून घेण्यासाठी कथा केवळ ऐकायची नसून तिचे चिंतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. राजा शीलनिधी, विश्वमोहिनी विवाह सोहळा, सीतामाईंच्या जन्माची कथा सांगताना महाराजांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. जनकराजांच्या नांगराच्या फाळातून भूमीतून प्रकट झालेली भूमिकन्या पुढे जगन्माता जानकी बनल्याचे वर्णन करताना अनेकांच्या डोळ्यांत भक्तिभाव दाटून आला. अधिकमासात रामकथा श्रवणाची संधी अत्यंत दुर्मिळ असून ती कोणत्याही परिस्थितीत दवडू नये, असे आवाहन त्यांनी केले. राम-सीतेच्या विवाहापासून वनवास, अयोध्येला पुनरागमन आणि धर्मसंस्थापने साठी भगवान रामांनी घेतलेल्या अवतारकार्याचे विवेचन करताना त्यांनी धर्मरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सज्जनांना त्रास होतो, पापाचा अतिरेक वाढतो तेव्हा भगवंत अवतार धारण करतो असे सांगत रामावतारा मागील दैवी हेतू उलगडून दाखविला. श्रावण बाळाच्या अद्वितीय मातृ पितृभक्तीची कथा सांगताना महाराजांच्या वाणीतील करुण रसाने वातावरण भारावून गेले. काशीविश्वेश्वराच्या दर्शनासाठी माता पित्यांना खांद्यावर घेऊन निघालेल्या श्रावण बाळाची कथा ऐकताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कथे दरम्यान राजाराम. रामराम, सीताराम. या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गगनगिरी महाराजांच्या कृपाछत्राखाली पार पडणाऱ्या या सोहळ्याचे वैभव साधुसंतांच्या उपस्थितीने अधिकच खुलले. अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. भगवान श्रीरामांच्या जन्मप्रसंगाचे वर्णन करताना महाराजांच्या वाणीतील भावमाधुर्याने जणू अयोध्येतील आनंदोत्सवच उपस्थितांसमोर साकार झाला. रघुनाथांच्या आणि प.पू. स्वामी गगनगिरी महाराजांच्या आरतीने वातावरण भक्तिरसाने ओथंबून गेले. रामनामाच्या अखंड गजरात आणि भक्तीच्या अमृतधारेत चिंब भिजलेल्या भाविकांनी या दिव्य सोहळ्याचा अविस्मरणीय आध्यात्मिक आनंद अनुभवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!