“अंधारातून प्रकाशाकडे… हजारो डोळ्यांना नवी दृष्टी देणाऱ्या मधुकर जत्ती यांचा भावनिक निरोप”
लोणी प्रतिनिधी :-
“डोळे हे मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय असून अनेक रुग्णांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याचे भाग्य मला लाभले, हीच माझ्या सेवाकार्यातील सर्वात मोठी कमाई आहे,” अशा भावनिक शब्दांत नेत्र चिकित्सा अधिकारी मधुकर जत्ती (गोसावी) यांनी आपल्या सेवानिवृत्तीप्रसंगी भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १९९४ पासून सुरू झालेला त्यांचा सेवा प्रवास तब्बल तीन दशकांहून अधिक काळ विविध ठिकाणी अविरत सुरू राहिला. मुरुड-जंजिरा, जिल्हा रायगड येथे प्रथम नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी ९ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर (अहमदनगर) येथे ५ वर्षे, ग्रामीण रुग्णालय अकोला, लोणी तसेच संगमनेर येथे कार्यरत राहून हजारो रुग्णांना दृष्टीदानाचे कार्य केले.
सेवाकाळात त्यांनी समता फाऊंडेशन, रोटरी क्लब, देशाई हॉस्पिटल तसेच मा. डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नेत्रशिबिरांमध्ये मोलाचे योगदान दिले. पद्मश्री अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील आरोग्य मोहिमा, महाआरोग्य शिबिर पंढरपूर, नमो नेत्र संजीवनी अभियान, रस्ते सुरक्षा सप्ताह अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
ग्रामीण रुग्णालय लोणी व संगमनेर येथे आदरणीय डॉ. जऱ्हाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी आपले परमभाग्य असल्याचे सांगितले. “ही सेवा कधी संपली हेच समजले नाही,” असे सांगताना त्यांच्या शब्दांत सेवाभावाची प्रामाणिकता जाणवत होती.
कोरोना काळातील अनुभव सांगताना ते भावूक झाले. संगमनेर येथे २०१९ मध्ये रुजू झाल्यानंतर देशात कोरोनाचे संकट आले आणि त्यांची प्रतिनियुक्ती अहमदनगर येथे करण्यात आली. दुसऱ्या लाटेतही आदेशानुसार शस्त्रक्रिया शिबिरे सुरू ठेवत त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन काम केले. त्याचदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्या कठीण प्रसंगी डॉ. जऱ्हाड सर व डॉ. कचेरिया सर यांनी “तुम्ही उपचार करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा दिलेला मानसिक आधार ते आयुष्यभर विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या सेवाप्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.
चौकट :-आपण सर्व माझ्या सुखदुःखात कायम सोबत राहिलात. पुढील आयुष्याचा हा नवा प्रवासही आपल्या प्रेम, आशीर्वाद आणि आपुलकीमुळे अधिक प्रेरणादायी ठरेल”
( मधुकर जत्ती (गोसावी) नेत्र चिकीत्साअधिकारी ग्रा.रू.संगमनेर )
या सेवापूर्ती सोहळ्यासाठी मा.अधीक्षक ग्रामीण रुग्णालय संगमनेर डॉ. राजकुमार जऱ्हाड सर, डॉ. पारधे राहुल, देशमुख साहेब, कैलास भाऊ, आरबीएसकेचे डॉक्टर व स्टाफ, नेत्रशिबिरांमधील डॉ. शार्दूल देशमुख, डॉ. आहेर, डॉ. थोरात, डॉ. पारधी, तसेच पालवे सिस्टर, माळी सिस्टर, डोली सिस्टर, मोमीन, कांबळे ब्रदर, नर्सिंग स्टाफ, लॅब विभागातील मॅडम व कर्मचारी, मेडिसिन विभागातील संचिती सर, तसेच १०२ व १०८ सेवांचे पायलट आणि सेवक वर्ग यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
