विद्याभवन विद्यालयात डॉ. जयश्रीताई थोरात यांनी साधला चिमुकल्यांशी संवाद
संगमनेर (प्रतिनिधी) अण्णासाहेब काळे
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर आरोग्याचे महत्त्व बालपणापासूनच कळले पाहिजे. सदृढ निरोगी बालकाबरोबर बुद्धिमत्तेने विकसित विद्यार्थी घडवण्यावर विद्याभवन शाळेने दिलेला भर हा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे
अमृत नगर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात प्राथमिक विद्याभवनने आयोजित केलेल्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ होते. तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन संतोष हासे ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कार्याध्यक्ष रामदास तांबडे , शरद गुंजाळ ,अशोक मुटकुळे, नवनाथ गडाख, संदीप दिघे, अशोक कवडे यांचा सांस्कृतिक मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. सर्व शाळांमधून इंग्रजी व विज्ञानावर विशेष भर दिला जात असून हाच पॅटर्न विद्या भवन या शाळेने सुद्धा राबवले आहे .सातत्याने विविध उपक्रमांबरोबर विद्यार्थ्यांसाठी आरोग्याचे दिले जाणारे शिक्षण हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
तर बाबा ओहोळ म्हणाले की, कारखान्याच्या माध्यमातून सांस्कृतिक मंडळांने विद्याभवन हे विद्यालय सुरू केले असून यामधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देशात व परदेशात कार्यरत आहेत. गुणवत्ता पूर्ण शिक्षण हेच या संस्थेचे वैशिष्ट्य असल्याची ते म्हणाले..
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अर्चना आंबरे यांनी केले सूत्रसंचालन मुख्याध्यापिका संगीता मस्के यांनी केले तर रामदास तांबडे यांनी आभार मानले..
