वक्तृत्वाला कर्तुत्वाची जोड दिल्यास जीवन यशस्वी होते -सुरेशजी कोते.
लोकवेध live न्यूज
पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी-सचिन लगड
” व्यवसाय,उद्योग व राजकारणात वक्तृत्व महत्त्वाचे असते. नुसते बोलके पोपट जीवनात यशस्वी होत नाहीत.विचाराला कृतीची जोड देणे आवश्यक असते. तसेच वक्तृत्वाला कर्तुत्वाची जोड दिल्यास जीवन यशस्वी होते ” असे प्रतिपादन पुणे येथील लिज्जत पापड महिला गृहउद्योगाचे कार्यकारी संचालक मा. सुरेशजी कोते यांनी केले.ते राजूर येथील ॲड. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कै. होनाजी तुकाराम कोंडार राज्यस्तरीय वादविवाद व कै. माधवराव दिगंबर उमराणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सत्यनिकेतन संस्थेचे सचिव व माजी प्राचार्य टी. एन. कानवडे यांनी खंत व्यक्त केली की, ” आमच्या विद्यार्थी दशेत वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेला निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होत असे आज स्पर्धेसाठी विद्यार्थी शोधावे लागतात. कै.माधवराव दिगंबर उमराणी वक्तृत्व स्पर्धेचे देणगीदार मा. मिलिंदजी उमराणी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की,” ॲड. देशमुख महाविद्यालयाच्या वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेतून कैलास चावडे, गणेश बारगजे, नितीन तळपाडे, चंद्रकांत घुले, एकनाथ यादव यांनी शिक्षण, प्रशासन अध्यात्म राजकारण या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. हे या महाविद्यालयाच्या स्पर्धेचे खरे यश आहे. ” माजी प्राचार्य श्रीनिवास येलमामे यांनी आपल्या भाषणात ” नेतृत्वाला वक्तृत्वाची गरज असते व वक्ते समाजातील घटक असल्याचे सांगितले.” कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी ” प्रभावी वक्तृत्व व वादविवादासाठी विषयाची खोली , विषय मांडणी,अवधान,वेळेचे नियोजन, व हावभाव या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.” यावेळी विजय पवार, प्रा. जगन्नाथ आरोटे व वादविवाद स्पर्धेचे परीक्षक प्रा. लक्ष्मण घायवट व प्रा. बबन पवार उपस्थित होते.

वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन लिज्जत पापड उद्योगसमूहाचे कार्यकारी संचालक सुरेशजी कोते यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाच्या वादविवाद व वक्तृत्व मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. पंढरीनाथ करंडे यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. डॉ. भरत शेणकर यांनी करून दिला, तर प्रा. अरुण सातपुते यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन व सूत्रसंचालन केले. स्पर्धेत विविध महाविद्यालयातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
