ज्ञानेश्वरी लोकभाषेतील ज्ञानाचा अथांग सागर
▪️संत ज्ञानेश्वर माऊली हे विश्वाचे रत्न
▪️वारकरी संप्रदायाचे हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत योगदान. – स्वामी नरेंद्रचार्य
संगमनेर
श्री स्वामी गगनगिरी महाराज हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण संगमनेर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचे अलौकिक चैतन्य अवतरले आहे. या पवित्र सप्ताहात जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन सानिध्याने वातावरण अधिक मंगलमय झाले असून हजारो भाविकांनी उपस्थित राहून आध्यात्मिक आनंदाचा लाभ घेतला.
यावेळी स्वामी श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना प्रवचनरूपी अमूल्य सेवा दिली. आपल्या रसाळ आणि प्रभावी वाणीतून त्यांनी श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या कार्याचा, तपश्चर्येचा आणि अध्यात्मिक महत्त्वाचा उहापोह केला. संतांचे विचार आणि संस्कार समाजाला योग्य दिशा देतात, असे सांगत त्यांनी धर्म, संस्कृती, कर्तव्य, भक्ती आणि मानवी जीवनातील मूल्यांवर सखोल निरूपण केले.भारतीय सनातन संस्कृतीतील निसर्ग आणि मानव यांचे अतूट नाते अधोरेखित केले. वृक्षवेली सोयरे आहेत; त्या मानवापासून वेगळ्या नाहीत असे सांगत त्यांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. विज्ञानाने जगात क्रांती घडवून आणली असली, तरी अध्यात्माशिवाय खरी शांती मिळू शकत नाही, असे प्रतिपादन करत विज्ञानवादी दृष्टीकोनासोबत संस्कृती आणि शेतीची मुळे जपण्याचे आवाहन स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले
स्वामीजींच्या विचारांनी भारावून गेलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रवचनाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर “जय गगनगिरी महाराज” आणि हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. भक्तिमय वातावरणात भाविकांना आध्यात्मिक समाधानाची अनुभूती मिळाली.
विशेष म्हणजे, अधिक मासाच्या पावन पर्वात आयोजित करण्यात येणाऱ्या या सप्ताहाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच विविध भागांतून लाखो भाविक गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी येथे दाखल होत असतात. दर्शनाबरोबरच भाविकांना प्रेमाने दिला जाणारा आमटी-भाकरीचा महाप्रसाद हे या सप्ताहाचे विशेष आकर्षण मानले जाते.
भक्ती, सेवा, अध्यात्म आणि सामाजिक एकात्मतेचा संगम घडविणारा हा सप्ताह भाविकांसाठी एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरत असून, श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या कृपेने आणि संतांच्या मार्गदर्शनाने भक्तगण भक्तिरसात तल्लीन होत आहेत.
