दिपावली निमित्त राजहंस दूध संघाकडून 35.66 कोटी रुपये बँकेत वर्ग-रणजीत सिंह देशमुख
संगमनेर / लोकवेध live न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना कायम शेतकरी व नागरिकांना मदत केली आहे. दीपावली निमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, दूध वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट व अनामत, कामगारांचा बोनस आणि मेहनताना, पगार, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण 35.66 कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर बँकेत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना रणजीत सिंह देशमुख म्हणाले की,काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दीपावली निमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने शेकडो कोटी रुपये बाजारात येतात. यामुळे संगमनेर तालुक्याच्या दिवाळीत मोठी भरभराट निर्माण होते. राजहंस दूध संघा कडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवठ्यावर दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर फरक अदा करण्यात येतो.
हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून दूध उत्पादक व कामगारांची दिवाळी गोड करताना दीपावलीनिमित्त दूध उत्पादक, दूध वाहतूक ठेकेदार व कामगारांना भरीव रक्कम वाटप होत असल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल निर्माण होणार असून यामुळे दूध उत्पादक ,दूध वाहतूक ठेकेदार ,कामगार व व्यापारी वर्गामध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर दूध संघाची वाटचाल सुरू असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षाची एकूण उलाढाल 530.38 कोटी रुपयांची झाली आहे. ही संगमनेर तालुक्यातील सहकारासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. दीपावली निमित्त वरील सर्व रक्कम विविध घटकांना अदा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने 2 नोव्हेंबर 2023 रोजी च्या बैठकीत घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन रणजितसिंह देशमुख ,व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर ,ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे, आर.बी. राहणे, विलासराव वर्पे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर ,विलास कवडे ,बबनराव कुराडे ,बादशहा वाळुंज, संजय पोकळे ,विक्रम थोरात ,विष्णू ढोले, तुकाराम दातीर रवींद्र रोहम भारत मुंगसे ,डॉ प्रमोद पावसे ,सौ प्रतिभाताई जोंधळे ,सौ मंदाताई नवले ,कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी, जनरल मॅनेजर गणपत शिंदे आधी उपस्थित होते..
संघाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील दूध उत्पादक कामगार व व्यापारी वर्गामध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळीनिमित्त हा गोड निर्णय घेतल्याबद्दल दूध संघाचे मार्गदर्शक मा. कृषी व महसूल मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात ,दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा चेअरमन राजेंद्र चकोर व सर्व संचालक मंडळाचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे..
