विद्यार्थीच होतात पेपर सेटर, सुपरवायझर, एक्झामिनर व बक्षिसाचे प्रायोजकही.
गगनगिरी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी गौरव दिन उत्साहात साजरा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
राजभाषा मराठी गौरव दिन 27 फेब्रुवारी व राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी हे दोन महत्त्वाचे दिन ऐन परीक्षेच्या धामधुमीत येतात. बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या असतात. इयत्ता दहावीचे अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि केंद्रावरील बोर्ड परीक्षेची तयारी या सर्व धामधुमीमध्ये शिक्षकांना यासाठी वेळ देताना मर्यादा येतात. अशावेळी इयत्ता नववीतील विद्यार्थी हे दोन्ही दिनविशेष वेगळ्या पद्धतीने साजरे करतात.
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी या वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी मराठी व विज्ञान विषयांतर्गत अभ्यासक्रमातील व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नममंजुषा परीक्षा घेतली जाते. यासाठी 25 गुणांची मराठीसाठी स्वतंत्र व विज्ञानासाठी स्वतंत्र तसेच प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र बहुपर्यायी प्रश्नपत्रिका विद्यार्थीच तयार करतात. यात त्या इयत्तेच्या अभ्यासक्रमात असणारे लेखक, कवी वैज्ञानिक त्यांचे कार्य यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न असतात. तसेच व्याकरण व विविध प्रात्यक्षिके त्यांची निरीक्षणे यावरील आधारित प्रश्नांचाही समावेश असतो. विद्यार्थीच संबंधित प्रत्येक वर्गात जाऊन परीक्षेत सहभागी होण्यासाठी सूचना देतात. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवृत्त करतात. प्रत्येक परीक्षेसाठी पाच रुपयांची परीक्षा फीही विद्यार्थीच गोळा करतात. यातून तीन रुपये प्रश्नपत्रिकेसाठी व उर्वरित दोन रुपये आयोजनाचा खर्च व बक्षीसासाठी ठेवतात. साधारण पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान विद्यार्थीच परीक्षेचे आयोजन करतात. सुपरव्हिजनही करतात. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परीक्षकही विद्यार्थीच असतात. प्रत्येक इयत्तेतून प्रत्येक विषयासाठी प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिले जातात. या पारितोषिकांसाठी नववीतीलच विद्यार्थी प्रायोजक होऊन अधिकची रक्कम जमा करतात. कंपासपेटी, परीक्षापॅड, वही,पेन,पेन्सिल,खोडरबर इत्यादी शैक्षणिक साहित्य बक्षीसांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलनही विद्यार्थीच करतात. या सर्व आयोजनातुन विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यांची रुजवणूक होते. यातील विविध कामांसाठी विद्यार्थी एकत्रित ग्रुप तयार करतात, संघ भावना, प्रश्न तयार करण्याचे कौशल्य, परीक्षेचे संचालन करण्याचे नियोजन, हिशोबाचा अंदाज बांधून खर्च करणे,हिशोब ठेवणे, बक्षीसासाठीचे शैक्षणिक साहित्य खरेदी करणे, सभा धारिष्टाने सूत्रसंचालन करणे इत्यादी कौशल्यांचे अनौपचारिक शिक्षण यातून विद्यार्थ्यांना मिळते.
या सर्व उपक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्यांची प्रेरणा, मराठी व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभते. गेल्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून हा उपक्रम या विद्यालयात आयोजित केला जातो.
