प्रिय ती. दादा,
साष्टांग नमस्कार,

        दादा, तुम्ही यावर्षी १०० वर्षांचे झाले. तुमच्या जनशताब्दी निमित्त आनंदोत्सव साजरा करीत आहोत. तुमच्या सोबत ती. डॉ. अण्णामामांची ही जनशताब्दी साजरी करत आहोत. या निमित्ताने आम्हा सर्वांना तुमची क्षणोक्षणाला आठवण येत आहे.
          खरंतर, आपल्या कुटुंबाला १०० वर्षे जगण्याची देणगी तुमचे मामा ती. रघुनाथ तात्याबा दिघे यांच्याकडून मिळालेली आहे. आपल्या कुटुंबाला समाजकारण, राजकारण, वारकरी संप्रदायाची परंपरा पंजोबा ती. गंगाराम पा. थोरात पणजी ती. मंजुळाबाई थोरात यांच्याकडून मिळालेली आहे. आजपर्यंत तुमची मुले, मुली, पुतणे, पुतण्या, भाचे, भाच्या नातवंडे, पतवंडे यांच्या पर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. ते आपल्या रक्तातच आहे याचा आम्हाला आज अभिमान वाटतो.
         तुम्ही आम्हाला लहानपणापासूनच तुमच्या वागण्यातून कृतीतून जे शिक्षण दिले तीच परंपरा आम्ही पुढे चालवीत आहोत. आपल्या घरात तुम्ही भावंडे खूपच बुद्धिमान होते. आज ती. ताराबाई आत्या ९० वर्षांच्या आहेत. तरीही त्यांचे जगाचा इतिहास अभ्यास, विविध पुस्तकांचे वाचन चालूच आहे.
        तुमची व ती. अण्णा मामांची खूप मैत्री होती. ॲड. रावसाहेब मामा शिंदे, ॲड. पी. बी. कडू पाटील ती. धर्माजी पोखरकर हे तुमचे जीवलग सवंगडी. पुढे तुमचे घट्ट मैत्रीत, नात्यात रूपांतर झाले. तुम्ही एकमेकांचा किती आदर आदरातिथ्य, सन्मान करायचे ! देशातील प्रश्न, शेतीचे प्रश्न, सर्व घडामोडींवर गप्पारंगाच्या.
        तुम्ही सर्वजण स्वातंत्र्याच्या चळवळीत होते, इंग्रजांनी तुम्हाला अटक करून नाशिकच्या जेलमध्ये १५ महिने ठेवले होते. तेथे तुम्ही ती. अण्णामामा शिंदे, ॲड. रावसाहेब मामा, ती.धर्माजी पोखरकर व सर्व सहकाऱ्यांनी रोज संध्याकाळी पुस्तकांचे सामुदायिक वाचन केले. त्यात काही इंग्रजी पुस्तके ही होती. वाचनातून तुम्हाला आयुष्याचा पुढील काळात सहकाराची उभारणी सुचली. स्वातंत्र्यानंतर तुम्ही आयुष्याच्या अखेरीपर्यंत स्वतःला सहकारी चळवळीलाच समर्पित करून घेतले. ४८ वर्ष सहकारी बँकेत शेतकऱ्यांसाठी काम केले. संगमनेर तालुक्यात दुष्काळी, डोंगरी भागात तुम्ही सहकार उभा केला. सहकारी साखर कारखाना, दूध संघ, बँक शिक्षण संस्था उभ्या केल्या. पाईपलाईनचे फार मोठे काम करून संगमनेर तालुका सुजलम सफलम केला. तालुक्यात दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. गायी, देखभाल इ.चे मार्गदर्शन केले. त्यातून दुधाची क्रांती झाली. ज्या गावांमध्ये चहाला सुद्धा दूध नव्हते तेथे सहकारी दूध डेअरी उभ्या राहिल्या. मोठी आर्थिक क्रांतीच घडवून आणली. तुम्ही तुमचे आयुष्य स्वातंत्र्य लढा व सहकार यासाठीच वाहिले. मी तुम्हाला कधीही उशीरा उठलेले बघितले नाही. कधी लोळत पडलेले पाहिले नाही. सतत कामातच असायचे.
       आम्हाला शिक्षणासाठी तुम्ही वस्तीगृहात ठेवले. भेटायला येताना ती. बाई (माझी आई) खूप भाकरी, पिठलं, चटणी करून द्यायची. तुम्ही केळी, सफरचंद भरपूर आणायचे व माझ्या सर्व मैत्रिणींना बोलवायचे व म्हणायचे “चला, सर्व खाऊ संपवा. जेवण संपवा” तेव्हा मला कळत नव्हते की ही देखील एक सहकारचीच  शिकवण आहे. बाकी पालक मुलींना बिस्कीट, सुकामेवा आणायचे व सांगायचे जा पेटीत व्यवस्थित ठेवून दे, रोज खात जा. यातून तुम्ही मैत्री, स्नेह, एकोपा, सहकारची आठवण शिकवण दिली.
दादा, तुम्ही खूप कडक स्वभावाचे होते. आमचा कधीच लाड केला नाही. प्रत्येक काम करायला लावायचे. काम केले नाही तर शिक्षा द्यायचे. आम्हाला तुमचा खूप आदरयुक्त धाक होता. तुम्हाला उधळपट्टी चालत नव्हती. गरजा कमी ठेवायचे. तुम्ही स्वतः शेतीची, जनावरांची कामे करायचे. आजच्या तालुक्याचे जे आर्थिक चित्र आहे ते तुमच्या शिकवणीतूनच आहे. तुम्ही स्वतःसाठी काहीच विचार करायचे नाही पण तालुक्यात सहकाराची उभारणी करण्यासाठी तुम्ही हाडाची काड अन् रक्ताचे पाणी केले. गरजेपेक्षा जास्त कपडे सुद्धा कधीही स्वतःला व बाईला घेतले नाही. तुमचा कम्युनिझम तुम्ही आयुष्याच्या अखेरीपर्यंत जपला. अगदी स्वतःचा विवाह एकही रुपया खर्च न करता तुम्ही क्रांति सूर्य महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीच्या पद्धतीने केला. मला तर हा विचार आजच्या युगात कुणी करेल अशी खात्री वाटत नाही. आयुष्याच्या अखेरीस तुमच्या बॅगेत फक्त पाच खादीची धोतर, पाच खादीचे शर्ट, दुसरे टोपी व खादीचे रुमाल एवढेच होते. याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नव्हते. किती हा साधेपणा! किती ही अनासक्त वृत्ती!
         एवढ्या सहकाराच्या उभारणी नंतर वयाच्या ८२ व्या वर्षी वृक्षारोपणाची “दंडकारण्य चळवळ” तुम्ही उभी केली. त्यातून आज लाखो वृक्षांची लागवड झालेली आहे. किती नवनवीन संकल्पना तुम्हाला सुचायच्या व त्याची लगेच अंमलबजावणी ही तुम्ही करायचे. दवाखान्यात ॲडमिट असतांना शेवटच्या आठ दिवसांत तुम्ही भाऊ व डॉ. तांबेना बोलावले व सांगितले, “तळेगावला ज्युनिअर, सिनियर कॉलेज काढा. मुलींचे लवकर लग्न होत आहेत. सायन्स साईड काढा. मुली डॉक्टर, इंजिनिअर झाल्या पाहिजेत” १५ वर्षांत तळेगावला मोठे कॉलेज उभे राहिले आहे.
      आपल्या पश्चात आपण उभे केलेले सहकाराचे मोठे विश्व भाऊ अगदी व्यवस्थित उत्तम सांभाळीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपला सहकार मार्गदर्शक दिशादर्शक दीपस्तंभ आहे. संपूर्ण राज्याचे, काँग्रेसचे नेतृत्व भाऊ करत आहे. तुमच्या शिकवणीतून सर्व कारभार चोख चालू आहे.
       तुम्ही आम्हा सगळ्या बहिणींसाठी कर्तबगार जावई पाहिले. आम्ही सर्व मुली आनंदात आहोत. मी राजकारणात असल्याने मुलगी म्हणून तुम्हाला खूप काळजी वाटायची. पण दादा, माझ्या भोवती  भाऊ, डॉ. तांबे, सत्यजित, हर्षल व आपले सर्व कार्यकर्ते या सर्वांचे चांगले भक्कम कवच आहे. आम्ही तुमची तत्त्वे, मूल्य यांतूनच घडल्याने सर्व कारभार त्यानुसारच चालू आहे.
      खरंतर, तुम्ही आज १०० व्या वाढदिवसाला हवे होते. तुम्ही नेहमी खूप आनंदी असायचे. व या सर्व उभ्या केलेल्या संस्थांकडे डोळे भरून बघायचे “मी खूप हॅप्पी आहे” असे शब्द बोलायचे.
        तुम्हाला स्वातंत्र्यलढ्यात सांभाळलेल्या डोंगरदऱ्यांतील  कुटुंबांना तुम्ही कधीच विसरले नाही. सिन्नर, अकोले, संगमनेर तालुक्यांतील तुमच्या सर्व सवंगड्यांची मुले,मुली, नातवंडे यांच्याशी आमच तसेच नातं आहे. ते ही जपतात व आम्ही सर्वजण ही जपतो. एवढ्या कामाच्या व्यापातून तुम्ही मुले, मुली, नातवडांना वर्षातून एकदा निसर्गात फिरायला न्यायचे. करवंद खाण्यासाठी जंगलात न्यायचे. तुम्हाला रानमेवा खूप आवडायचा. बोर, कवठ, हरभरा,  ओल्या शेंगा मावळ्याची मक्याची कणसं खातांना प्रत्येक क्षणी तुमची आठवण येते.
दादा तुम्ही मोठ्या कष्टाने उभारलेल्या ह्या सहकारातून तालुक्यात समृद्धी आलीय. शहरात तर भारतातील सर्व बँका, मॉल, सोन्याचे दुकाने, हॉटेल आलीत. बाजार पेठ फुलून गेलीय. व्यापार खूप जोरात चाललाय. जिल्ह्यातून लोक खरेदीला संगमनेरला येतात. आर्थिक उलाढाल प्रचंड झालीय. चार चाकी गाड्या, मोटार सायकलला पार्किंगला जागा नाही. मला आठवतंय तुम्ही संगमनेर तालुक्यात पहिल्यांदा ट्रॅक्टर आणला तर लोक ट्रॅक्टरला बघून घाबरून लांब पळायचे. सगळं गाव गोळा झाला होता ट्रॅक्टर बघायला.आणि आज गाड्यांना जागा नाही.
        खरंच दादा, तुम्ही कधीच मी  अन् माझे असा स्वार्थीपणा केला नाही. कधी जात – पात पाळली नाही. तुमची माणसांवर प्रेम  करायची पद्धतच वेगळी होती. त्यातूनच आजही तालुक्यातील आणि जिल्ह्यातील माणसं तुमची आवर्जून आठवण काढतात. तुमच्याबद्दल अंत:करणापासून भरभरून बोलतात.
          एवढे कष्ट, एवढी उभारणी तुम्ही स्वतःसाठी केली असती तर भारतातील मोठ्या उद्योगपतींच्या यादीत तुमचे नक्कीच नाव असते. पण असा विचारही  आयुष्याच्या अखेरपर्यंत तुमच्या मनाला कधी शिवला नाही. व तशी शिकवणही तुम्ही आम्हाला दिले नाही. आम्ही धन्य झालो, दादा !
         तुम्ही शेवटी ॲडमिट असतांना घरी जाण्याचा हट्ट धरला. आम्ही घरी नेले. तुमच्या बेडसमोर तुम्ही निळवंडे धरणाचा पाणी पडताना चा फोटो लावला होता. घरी गेल्यावर त्या फोटोकडेच बघत बसला व नंतर म्हणालात, “आता मला पिठलं अन् ज्वारीची भाकरी जेवायला आणा” जेवणानंतर तुम्ही आपोआप ग्लानीत गेलात अन् डोळे मिटले. आम्ही तुम्हाला परत ॲडमिट केले. मात्र त्यानंतर तुम्ही आम्हाला सोडून गेलात.
         दादा तुम्ही गेलात पण मला तुम्ही म्हणाले होते. “दुर्गाताई, रडायचे नाही बरं का! किती किती शिकवले तुम्ही आम्हाला. तुमच्या या शिकवणीतूनच मी इतकी वर्ष शहराचे यशस्वीपणे नेतृत्व करू शकले.
        तुमच्या या कार्यामुळे, उभारणीमुळे तुम्ही आमच्यात आहात असे वाटते. खूप खूप बोलले तुमच्याशी तुम्ही असताना बोलायला तुम्हाला वेळ नसायचा. व आदर युक्त भीतीतून आम्ही मुलं तुमच्याशी कधीच गप्पा मारल्या नाही. पण आज या पत्ररूपाने तुमच्याशी संवाद साधताना मला साक्षात तुमच्याशी प्रत्यक्ष बोलत असल्याचीच अनुभूती मिळत आहे.
            
तुमची कन्या,
 दुर्गा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!