पिंपरणेत आषाढी एकादशी सोहळ्याच्या भक्तीरसात ग्रामस्थांसह चिमुकले रमले
संगमनेर / लोकवेध live न्यूज
आषाढी वारीचे महत्व, दिंडींची परंपरा मानव जातीला सामाजिक समानता आणि भेदभाव निर्मूलनाचा संदेश देत असते
सर्वत्र आाषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीचे खास असे महत्व आहे. वर्षभरातील सर्व एकादशीं पैकी ही आषाढी एकादशी सर्वात मोठी आणि महत्वाची मानली जाते. त्यामुळे, या आषाढी एकादशीला महाएकादशी असे म्हटले जाते. हा एकादशी उत्सव संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडीतील लहान मुले आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला यावेळी विठ्ठल रुक्मिणीची आरती करून रथामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे प्रतिमा ठेवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली टाळ मृदूगांच्या निनादात भावगीत भक्ती तसेच भजनाच्या तालावर पुरुषांनी नाचण्याचा तर महिलांनी फुगडी चा आनंद घेतला
मुलांनी दिंडी सोहळ्यात पर्यावरण, मतदान, बेटी बचाओ, बेटी पढाओ याबाबत जनजागृती केली. विद्यार्थी वारकरी, मुलींच्या डोक्यावर तुळशी – वृंदावन, ग्रंथ दिंडी, भगव्या पताका व विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. हनुमान मंदिरासमोर रिंगण करुन विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी ग्रामस्थांनी माऊली..माऊली ..चा जयघोष केला.
लहान मुलांनी केलेली विविध देवतांची रंगभूषा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले रथाचे महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले विठ्ठलाच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते मिरवणुकीनंतर गावातील हनुमान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला व शेवटी विठ्ठलाच्या आरती घेऊन आलेल्या सर्व भाविकांना आषाढी एकादशी सोहळा समितीच्या वतीने खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात आला
