“जवानांचे बलिदान अजरामर… त्यांच्या कुटुंबांचा सन्मान ही आपली जबाबदारी – आ. खताळ”
कारगिल विजय दिनानिमित्त तळेगाव दिघे येथे ध्वजारोहण, वीरांना अभिवादन आणि वृक्षारोपण
संगमनेर / लोकवेध live न्यूज
“आपण आज सुरक्षितपणे आपले जीवन जगत आहोत, त्यामागे आपल्या वीर जवानांचे अपार बलिदान आणि कष्ट आहेत. देशाच्या सीमांवर रात्रंदिवस उभे असणारे जवान हेच खरे राष्ट्राचे रक्षक आहेत. त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे उद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.
तालुक्यातील तळेगाव दिघे येथे आयोजित कारगिल विजय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या निमित्ताने हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण, ध्वजारोहण आणि वृक्षारोपण करून देशभक्तीची आणि पर्यावरण जागृतीची प्रेरणा दिली गेली.
कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा जवानांना अभिवादन करून झाली. यानंतर आमदार खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “देशासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांचे ऋण फिटणारे नाही. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबांचा सन्मान करणे हे किमान आपण करू शकतो.”
बिरोबा महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आ. खताळ आणि माजी सैनिकांच्या हस्ते वटवृक्ष, पिंपळ व निंब यासारखी पर्यावरण पूरक झाडे लावण्यात आली. “या वृक्षांचे संगोपन गावातील वृक्षप्रेमींनी करावे,” असे आवाहन आ. खताळ यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास मेजर राजेंद्र गुंजाळ, मेजर रामनाथ दिघे, सुनील दिघे, भाऊसाहेब दिघे, महेश दिघे, मच्छिंद्र दिघे, गणेश दिघे, तात्यासाहेब राहणे, संदीप क्षीरसागर, मयूर दिघे (प्रभारी सरपंच), अमोल दिघे, दत्तात्रय दिघे, रवींद्र दिघे, रामदास दिघे, डॉ. संतोष डांगे, ज्ञानेश्वर जानेकर, गोरख इल्हे, अशोक दिघे, विलास दिघे, विनायक कांदळकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी, माजी सैनिक, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. खताळ म्हणाले, “काही ठिकाणी दुर्दैवाने जवानांच्या कुटुंबीयांना उपेक्षा सहन करावी लागते, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. या देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आयुष्य वाहिलं, त्यांच्या घरच्यांचा सन्मान राखणं, ही खरी देशभक्ती आहे.”
श्रावणात अध्यात्म आणि पर्यावरणाचा संगम
कारगिल विजय दिनाच्या पूर्वसंध्येला आमदार खताळ यांनी बिरोबा महाराज मंदिरात दर्शन घेऊन श्रावण महिन्याची सुरुवात अध्यात्मिक भक्तिभावाने केली. त्यानंतर मंदिर परिसरात माजी सैनिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून श्रावणात हरितसंवर्धनाचा संकल्प घेतला.
देशसेवकांचा सन्मान, पर्यावरण संवर्धन आणि समाजप्रबोधनाचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमातून एक सकारात्मक संदेश जनमानसात पोहोचला. जवानांचे बलिदान केवळ स्मरणात न ठेवता त्यांच्या कुटुंबांचा सन्मान हीच खरी कारगिल विजय दिनाची प्रेरणा ठरली.
