“मित्रा, निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा…” २३ वर्षांनी पुन्हा उजळले बालपणाचे दिवस
अंबेजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री
मैत्रीच्या बंधनाला काळाचा अडसर नसतो, उलट वर्षानुवर्षांची दूरावाट ती नातं अधिकच घट्ट करते. “मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा, मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा…” या कवितेतील ओळींप्रमाणेच श्री दत्त माध्यमिक विद्यालय, शै. वर्ष २००१-०२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांचे गुरुजनांनी तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत हृदयाला स्पर्श करणारा स्नेहमिलन मेळावा साजरा केला.
🌸 आठवणींची उधळण, बालपणाचा सोनेरी प्रवास
वयाच्या १६-१७व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र-मैत्रिणी, शिक्षक-शिक्षिका ७-८ महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र जोडले गेले. आणि अखेर रविवार, १० ऑगस्ट रोजी आपल्या लाडक्या शाळेच्या प्रांगणात सर्वांची प्रत्यक्ष भेट घडली. शाळेच्या परिसरात हातात हात घेवून काढलेली स्नेहमिलन फेरी जणू जुन्या आठवणींच्या अंगणात फेर धरत होती.
🌸 शिक्षक-विद्यार्थ्यांचा भावनिक संगम
सभागृहात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गुरुजनांचा सत्कार व स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षिका शोभा गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक काकडे, हनुमंत आपेट, चंद्रकांत सोळंके, ग्यानदेव सुरवसे, लालासाहेब चोपडे, सुरेश मंत्री आदी उपस्थित होते.
पहिल्या सत्रात बालपणीच्या आठवणी, वर्गातील गमतीजमती, कौटुंबिक अनुभव आणि जीवनातील घडामोडी यांची मनमोकळी देवाणघेवाण झाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत – “जशी तुम्ही घडला, तशीच तुमची पुढची पिढी घडवा” – असा मौल्यवान संदेश दिला.
🌸 पुन्हा एकदा वर्गात…
दुसऱ्या सत्रात माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेच्या बाकांवर बसून आपल्या गुरुजनांकडून शिकण्याचा बालपणाचा अनुभव घेतला. जणू वेळेचा काटा उलट फिरला होता.
🌸 अश्रूंनी भिजलेले निरोपक्षण
२३ वर्षांनी भेटलेले मित्र-मैत्रिणी परत जाताना एकमेकांच्या डोळ्यात पाणी होते. “पुन्हा कधी भेटायचं?” हा एकच प्रश्न सर्वांच्या ओठांवर होता. वर्षातून किमान एकदा भेटण्याचा निर्धार करतच सर्वांनी निरोप घेतला.
🌸 कार्यक्रम यशस्वी करणारे हात
या स्नेहमिलनासाठी अनंत काकडे, रमेश सोमवंशी, व्यंकट सोमवंशी, पप्पु सोमवंशी, राहुल देशमुख, सतीश साखरे, बाळासाहेब कांबळे, रमेश कांबळे, धोंडीबा सुरवसे, अनिरुद्ध जोशी, धम्मानंद बनसोडे, अविनाश जाधव, युवराज सोमवंशी, दत्तात्रय सोमवंशी, डिगांबर सोमवंशी, पांडु मोरे, दिलीप राडकर आदींनी परिश्रम घेतले.
हा मेळावा फक्त आठवणींचा सोहळा नव्हता, तर आयुष्यातील एक अनमोल अध्याय पुन्हा नव्याने लिहिण्याची सुरुवात होती.
