संगमनेरमध्ये बौद्ध समाजाची ठाम भूमिका
“मागण्या पूर्ण करणाऱ्यांनाच पाठींबा” — बुदिस्ट युथ फेडरेशनची घोषणा
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर शहरातील बौद्ध समाजाने आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनेक वर्षांपासून विविध पक्षांसोबत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या बौद्ध समाजाने यापुढील राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “बौद्ध समाजाच्या मागण्या पूर्ण करणाऱ्या पक्षालाच पाठिंबा दिला जाईल”, असा ठाम इशारा बुदिस्ट युथ फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा बौद्ध समाज आजवर न्याय, हक्क आणि अस्मितेसाठी सातत्याने लढत आला आहे. तथापि, अनेक वर्षे राजकीय सहभाग असूनही मूलभूत मागण्या पूर्ण न झाल्याने समाज आता संघटित भूमिकेतून पुढे येत आहे.
पत्रकात बौद्ध समाजाच्या एकत्रित मागण्यांची यादी जाहीर करण्यात आली असून त्या पुढीलप्रमाणे—
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे.
- बौद्ध समाजासाठी बहुउद्देशीय सभागृह / सांस्कृतिक भवन निर्माण करणे.
- शहराच्या मध्यवर्ती भागात बौद्ध विहार व विपश्यना केंद्र उभारणे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन ठिकाणांना विशेष दर्जा देऊन स्मारक विकसित करणे, यात —
अ) पानोडी (थोरात वाडा),
ब) पिंपरणे (रोहम वस्ती),
क) बौद्ध वस्ती (पुणेनाका, संगमनेर) यांचा समावेश. - शहर व तालुक्यातील निर्णायक बौद्ध जनसंख्येनुसार योग्य राजकीय प्रतिनिधीत्व देणे, तसेच समाज सुचवेल त्या व्यक्तींनाच संधी देणे.
- सुशिक्षित बेरोजगार बौद्ध युवकांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण केंद्र उभारणे.
या मागण्या मान्य करणाऱ्यांनाच यापुढे समाजाचा पाठींबा राहील, असा ठाम संदेश संघटनेने दिला आहे. प्रसिद्ध पत्रकावर सचिन साळवे, अमोल कदम, सचिन गायकवाड, बाबासाहेब मोकळ, रवी भालेराव, सुरेश बागुल, गौरव यादव, निलेश कुसरे आदींच्या सह्या आहेत.
या घोषणेमुळे आगामी निवडणुकीत बौद्ध समाजाची भूमिका महत्त्वाची ठरणार हे निश्चित झाले आहे.
