बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातील आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.
या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय डॉन किंवा माफिया आहे असे वाटते. त्याने प्रत्येकाच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. अक्षय खन्ना हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान आणि परिपक्व अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनेता आणि राजकारणी विनोद खन्ना यांचा मुलगा असला तरी अक्षय याने कधीही आपल्या ओळखीचा फायदा घेतला नाही. १९९७ साली ‘हिमालयपुत्र’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केले. पदार्पणातच त्याने अभिनयाची वेगळी छाप पाडली आणि तो फक्त ‘स्टार किड’ नसून एक दमदार कलाकार आहे याची जाणीव प्रेक्षकांना करून दिली. काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर अक्षय खन्ना परत आला आणि पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘दृश्यम २’, ‘सब कुशल मंगल’, ‘सेक्शन ३७५’ यांसारख्या चित्रपटांत त्याने वेगवेगळ्या छटांचे पात्र साकारून स्वतःला नव्याने सिद्ध केले. त्याच्या निखळ अभिनयामुळे त्याची मागणी पुन्हा वाढली आणि प्रेक्षकांनी त्यांचे कमबॅक खुल्या मनाने स्वीकारले.
अक्षय खन्नाने आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. ‘बॉर्डर’ मधील त्यांचा भावनिक आणि तडफदार अभिनय,’दिल चाहता है’ मधील सहज, आधुनिक आणि वास्तववादी भूमिका. ‘हमराज’ मधील ग्रे-शेड असलेले पात्र. ‘गांधी, माय फादर’ मधील गंभीर, संवेदनशील अभिनय. ‘दृश्यम २’ मधील प्रभावी आणि कडक तपास अधिकाऱ्याची भूमिका या साऱ्यांनी त्याच्या बहुप्रतिभेला सिद्ध केले. त्याने साकारलेली खलनायकाची भूमिकाही प्रेक्षक डोक्यावर घेताना दिसतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट. या चित्रपटात अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. निर्दयी आणि क्रूर सम्राटाच्या त्याच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. वयाची ५० वर्ष अक्षय खन्नानं एकट्यानं काढली आहे. त्याने आजही लग्न केलेलं नाही. त्याला संसार आणि मुलं नकोत. अक्षय खन्ना वयाच्या ५० व्या वर्षीही अविवाहीत का आहे याचं उत्तर त्याने स्वत:च एका मुलाखतीत दिलं होतं. “मी स्वतःला विवाहित असलेलं पाहू शकत नाही. कारण मला असं वाटतं की मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलोच नाही.”
भूमिकेचा सखोल अभ्यास, निस्सीम प्रामाणिकपणा, भावनांवर उत्तम नियंत्रण, वास्तववादी अभिनयशैली, नम्र स्वभाव आणि कामाबद्दलची निष्ठा यामुळे आज तो यशाच्या शिखरावर आहे.अक्षय खन्नाची जादू त्याच्या ‘डोळ्यांत’ आहे. या माणसाला संवाद बोलण्याची गरजच पडत नाही. ‘दिल चाहता है’ मधला ‘सिड’ आठवा… प्रेमात झालेला विरह त्याने फक्त एका स्मिताने आणि ओलावलेल्या डोळ्यांनी दाखवला होता. आणि आज? आज त्याच डोळ्यांतून आग ओकतोय तो! त्याची संवादफेक बघितली आहे? तो ओरडत नाही, तो किंचाळत नाही. तो शब्दांवर असा काही ‘पॉज’ घेतो, इतक्या हळू आवाजात बोलतो की ऐकणाऱ्याचा थरकाप उडावा. त्याचे ते ‘मान तिरकी करून बघणे’ आणि चेहऱ्यावर एक ‘गूढ हसू’ आणणे… हे बघताना अंगावर काटा उभा राहतो. नैसर्गिक अभिनय म्हणजे काय, याचा तो चालता बोलता धडा आहे.
तो कधीच मीडियाच्या मागे धावला नाही. त्याने कधीही फक्त गाजावाजा किंवा प्रसिद्धीसाठी काम केले नाही. माध्यमांपासून आणि लोकांच्या नजरेपासून दूर राहूनही, खन्ना आपल्या खऱ्या प्रतिभेने प्रेक्षकांना आणि चित्रपट निर्मात्यांनाही मोहित करत आहेत. “माझं काम बोलेल” या एकाच तत्त्वावर तो इतकी वर्षे तग धरून राहिला. लोक त्याला ‘कमी लेखलेला’ म्हणत राहिले आणि तो कोपऱ्यात राहून स्वतःला अजून धार लावत राहिला. आज त्याचा हा ‘कातील’ अवतार बघून एकच सांगावंसं वाटतं. बॉलिवूडला उशीर झाला असेल त्याला ओळखायला, पण त्याने सिद्ध केलंय की वाघ म्हातारा झाला तरी त्याची डरकाळी आणि नखांची धार कधीच कमी होत नसते. त्याच्या निवडक निवडींपासून ते त्याच्या अभिनय कौशल्यापर्यंत, त्याची प्रतिभा अतुलनीय आहे. त्याला आवडेल, पटेल आणि आव्हानात्मक असेल तीच भूमिका त्याने स्वीकारली. त्याचा अभिनय कुठल्याही दिखाव्याशिवाय, अतितडजोडीशिवाय, अगदी मनाच्या जवळ जाणारा असतो. त्यामुळे तो प्रत्येक व्यक्तिरेखेत पूर्णपणे मिसळून जातात हे त्याच्या यशाचे मोठे कारण. या अभिनेत्याने अनेकदा हे सिद्ध केले आहे की कलेचे महत्त्व केवळ सुनियोजित प्रचारापेक्षा जास्त असते. त्याच्या कारकिर्दीत चढ-उतार आले, तरीही त्याने कधी हार मानली नाही. मेहनत, चिकाटी आणि अभिनयाची खोल समज यामुळे त्यांनी स्वतःला एक विचारशील, दर्जेदार आणि अविस्मरणीय कलाकार म्हणून सिद्ध केले आहे. अक्षय खन्नाची यशकहाणी सांगते – खरा कलाकार त्याच्या आवाजात, त्याच्या मेहनतीत आणि त्याच्या मनापासून केलेल्या अभिनयात चमकतो. कोणाच्याही सोबत तुलना न करता आत्मसंतुष्ट राहणे हेच अक्षयच्या समाधानाचे आणि यशाचे गमक आहे.