नाथकृपेने न्हाऊन निघाली अडबंगनाथ तपोभूमी, भामानगर
२३व्या धर्मनाथ बीजोत्सवाची कृष्णभक्तीने ओतप्रोत सांगता
भामानगर/ श्रीरामपूर / सुभाष भालेराव
ॐ चैतन्य अडबंगनाथ तपोभूमी, भामानगर (भामाठाण), ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथे सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशिर्वादाने व गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली आयोजित २३वा भव्य धर्मनाथ बीजोत्सव अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा व आध्यात्मिक आनंदाच्या वातावरणात मंगलमय रीतीने संपन्न झाला. मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पौष कृ. १० पासून सुरू झालेल्या या महोत्सवाची सांगता बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी माघ शु. ३ रोजी करण्यात आली.
या नऊ दिवसांच्या कालावधीत संगीत रामायण कथा, श्री नवनाथ पारायण, किर्तन महोत्सव, नाथयज्ञ, नामयज्ञ व अन्नदान यज्ञ अशा विविध धार्मिक उपक्रमांनी तपोभूमी भक्तीरसात न्हाऊन निघाली. दररोज पहाटे काकडा आरतीने दिवसाची सुरुवात होत असे, त्यानंतर सकाळी नवनाथ पारायण, दुपारी प्रवचन व रामायण कथा, सायंकाळी हरिपाठ व नाथांची आरती आणि दिवसभर भाविकांसाठी अखंड महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी संगमनेरचे लाडके आमदार अमोल खताळ शिर्डीच्या नगराध्यक्ष कोते, सिद्धार्थ मुरकुटे धुळ्याच्या माजी आमदार शिवानी पाटील ताराबाद महिपती देवस्थान अध्यक्ष यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
बुधवार दि. १४ ते मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ या कालावधीत रामायणाचार्य ह.भ.प. श्री. रामरावजी महाराज ढोक यांनी आपल्या अमृततुल्य वाणीने संगीत रामायण कथेद्वारे प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन, मर्यादा, भक्ती व सत्यनिष्ठेचा संदेश प्रभावीपणे उलगडला. मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी ह.भ.प. श्री. अक्षय महाराज भोसले (पुणे) यांच्या मधुर व ओजस्वी कीर्तनाने श्रोते भावविभोर झाले. तर गुरुवार दि. १५ जानेवारी रोजी ह.भ.प. श्री. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समाजप्रबोधनात्मक व विचारप्रवर्तक कीर्तनाने उपस्थितांना अंतर्मुख केले.
धर्मनाथ बीजोत्सवाची भव्य सांगता बुधवार दि. २१ जानेवारी रोजी गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. आपल्या रसाळ वाणीतून त्यांनी अडबंगात देवस्थान तपोभूमी अडबंगनाथांच्या कृपेविषयी विस्तृत माहिती उपस्थित भाविकांना दिली व भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, माखनचोरी, गोवर्धनधारण, रासलीला व गीतेतील कर्मयोगाचा गूढ अर्थ अत्यंत भक्तीभावाने विशद केला. “कृष्णलीला म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षण प्रभूला अर्पण करण्याची साधना आहे,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
या धर्मनाथ बी सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देशाबरोबर परदेशातील भावी मोठ्या संख्येत उपस्थित होते चक्क युरोप मधील भक्त या सोहळ्यास उपस्थित होते
या सांगता कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण महोत्सव काळात भामानगर परिसर नाथसंप्रदायाच्या जयघोषाने, हरिनामाच्या गजराने व भक्तीरसाच्या लहरींनी भारावून गेला.
