आपल्या कर्तुत्वातूनच चमत्कार निर्माण होतो — के जी भालेराव
पेटीट विद्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन अतिशय गरिबी, दारिद्र्य व संघर्षातून गेले आहे परंतु भावी काळातील सर्वच नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे म्हणून समाजातील दारिद्र्य , गरिबी नष्ट व्हावे यासाठी सर्वांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे हे प्रश्न त्यांनी आपल्या कर्तृत्वातूनच सोडवले आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक के .जी भालेराव यांनी शहरातील सर डी एम पेटीट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री एच आर मोकळ यासह एच ए एल हायस्कूल ओझर चे मुख्याध्यापक कवी रमेश शिंदे ,पर्यवेक्षिका डॉ अस्मिता देशपांडे , इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड पेटीट प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका थोरात मॅडम सत्र प्रमुख शरद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख पाहुणे के जी भालेराव पुढे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध , महात्मा फुले , कबीर यांना आपले गुरु मानले होते. आपल्या गुरूंच्या विचारांनी प्रेरित होऊन डॉ. बाबासाहेबांनी देशासाठी संविधानाची निर्मिती केली सर्वांना आपले हक्क व कर्तव्य मिळावे यासाठी डॉ. आंबेडकरांनी घटनेत तशी तरतूद केली आहे असे पटवून दिले.
अध्यक्ष भाषणात प्राचार्य मोकळ म्हणाले की , शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र प्रत्येक नागरिकाने आत्मसात करून त्यादृष्टीने आपल्या जीवनाची वाटचाल करावी. यावेळी ज्येष्ठ कवी रमेश शिंदे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या कवितेतून व्यक्त करून उपस्थित सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांनी तर सत्र प्रमुख प्रकाश वनम यांनी सूत्रसंचालन केले . पर्यवेक्षिका डॉ. अस्मिता देशपांडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
