अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या आषाढी वारीने संगमनेर दुमदुमले
चिमुकल्यांच्या विविध वेशभूषातून अवतरली पंढरी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या सुमारे 250 विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई ,संत तुकाराम ,ज्ञानेश्वर, चोखोबा अशा विविध वेशभूषा करून पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचा संदेश देत दिलेल्या घोषणांनी संगमनेर दुमदुमले

संगमनेर बस स्थानक, नवीन नगर रोड, जाणता राजा मैदान, नामदार थोरात साहेब निवासस्थान ते यशोधन कार्यालय अशा झालेल्या या वारीत अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षरोपण ,झाडे जगवा, झाडे लावा अशा घोषणा देत आषाढी वारीचे दर्शन घडवले. या वारीचे सुदर्शन निवासस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई थोरात यांनी स्वागत केले. तर यशोधन कार्यालय येथे इंद्रजीत भाऊ थोरात , यांनी स्वागत केले. यावेळी समवेत प्राचार्य श्रीमती शितल गायकवाड श्रीमती शोभा हजारे,प्रा बाबा खरात, पी. वाय. दिघे ,नामदेव कहांडळ आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मॉडेल स्कूलच्या या विद्यार्थ्यांनी विविध संतांची केलेली वेशभूषा ही लक्षनीय ठरली. यामध्ये श्री विठ्ठल, रखुमाई, संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगे महाराज ,संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कबीर या विविध वेशभूषांनी लक्ष वेधले.
यावेळी बोलताना सौ कांचनताई थोरात म्हणाल्या की, माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका शिक्षणात अग्रगण्य आहे. चांगल्या शिक्षणासह चांगले संस्कार देणे ही तालुक्याची परंपरा आहे. पंढरीच्या वारीला महाराष्ट्रात मोठे महत्त्व असून या वारीत गोरगरीब, श्रीमंत, लहान ,थोर सर्व भक्तीभावाने एकत्र येतात. एकतेची प्रतीक असलेली ही वारी मॉडेल स्कूलच्या लहान मुलांनी संगमनेरात काढली आहे .यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे .या भक्तीमय वातावरणा बरोबरच विद्यार्थी देत असलेल्या पर्यावरण संवर्धनाचा संदेश हा सर्वांसाठी अत्यंत मौलिक असल्याचेही त्या म्हणाल्या.
तर प्रा. बाबा खरात म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देशभक्तीचे संस्कार मॉडेल स्कूलच्या माध्यमातून रुजवली जात आहे. संतांची परंपरा दाखवणारा हा दिंडीचा सोहळा कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
तर श्रीमती शीतल गायकवाड म्हणाल्या की, विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडेल स्कूलमध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवले असून संस्कारक्षम परिपूर्ण विद्यार्थी घडवणे यासाठी विद्यालयाच्या माध्यमातून काम केले जात असल्याचे ही त्या म्हणाल्या.
यावेळी प्रा बाबा खरात यांनी पर्यावरण गीते गायली. तर विद्यार्थ्यांनी विठू माऊली तू जगाची, जय हरी विठ्ठल ,माऊली माऊली असे विविध गीते गाऊन पालखी सोहळ्याचे रिंगणही केले.
