वृक्षसंपदेच्या रोपांच्या रोप..वे चे साधू,संत ग्रामस्थ,पर्यावरण प्रेमींकडून उदघाटन..

 

नाशिक / लोक वेध live न्यूज/ निलेश शेकोकार 

पुण्यभूमी ब्रह्मगिरीची परवानगी नसल्याने खासदारांचा रोपवे वादात अडकलेला असतांना अंजनेरी ब्रह्मगिरीच्या आकाशातील जटायू महाराजांची सत्ता उलथवून येथे रोपवेचा घाट का घातला जात आहे असा प्रश्न उपस्थीत करत आज पर्यावरण प्रेमींकडून वृक्षसंपदेच्या रोपांच्या रोप..वे चे ब्रह्मगिरी येथे उदघाटन करण्यात आले.
तपोभूमीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी वृक्षसंगोपनाचे महत्व सरकारच्या लक्षात आणून देणे गरजेचे झालेले आहे असे सांगत ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांवर वृक्षसंपदेच्या रोपांचा रोप..वे तयार करून येथील वृक्षसंपदेसाठी सरकारने व समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे. अनेक भाविकांची आपल्या नावाने एक तरी रोप ब्रह्मगिरी पर्वतावर लावण्याची इच्छा याबाबतचे योग्य नियोजन करून पूर्ण करण्याचा संकल्प पर्यावरण प्रेमींनी घेतलेला आहे. वृक्षसंपत्तीने समृद्ध विविध भारतीय प्रजातींच्या रोपांची लागवड या निमित्ताने ब्रह्मगिरी येथे करण्यात येणार आहे. तपोभूमी ब्रह्मगिरीचे पुनर्रवैभव प्राप्त करून देण्यासाठी हवेतील रोपवेची गरज नसून वृक्षसंपदेचा रोप..वे योग्य पर्याय ठरेल यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. रोजगारनिर्मिती बरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी येथील ग्रामस्थ मनरेगाच्या माध्यमातून वृक्षसंगोपनाचा प्रयत्न करत असतांना सरकारने सहकार्य करणे अपेक्षित आहे. देशाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या माता गोदेच्या उगमस्थानीच उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी खोल विहिरींमध्ये उतरण्याचे दृश्य दरवर्षी आपण बघत असतो. मागील वर्षी खुद्द पर्यावरण मंत्र्यांनी ब्रह्मगिरी गाठून जलजीवन योजनेतून येथील पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिलेले असतांना रोपवेचा नाद सोडून निवडून दिलेल्या जनसेवकांनी येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे जास्त गरजेचे आहे. या भागावर जलदेवता प्रसन्न असतांना शासकीय प्रशासकीय उदासीनता नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नसेल तर येथे वृक्षसंपदेचे संगोपन अवघड काम ठरत आहे. जटायू पक्षांचा अधिवास धोक्यात घालून अंजनेरी ब्रह्मगिरी रोपवेची काय गरज असा प्रश्न घेवून पर्यावरण प्रेमींनी मा.वनमंत्र्यांची भेट घेतली. मा.वनमंत्र्यांच्या भेटीनंतर जिल्हाधिकारी ब्रहमगिरी अंजनेरी या पुरातन वनांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांच्या ठरावाला मान देवून जटायू पक्षांचा अधिवास संपविणाऱ्या प्रस्तावित रोपवे विरोधात अहवाल मा.वनमंत्र्यांना सादर करतील अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींना आहे. वृक्षसंपदेच्या रोपांमुळे गोदावरीची निर्मळता अखंडित राहणार आहे. कुंभमेळ्याची तयारी करत असतांना सरकारचे गोदावरीच्या उगमस्थानाकडे दुर्लक्ष होत आहे.

लाखो भाविकांनी दुमदुमणाऱ्या ब्रह्मगिरीला लागलेले पर्यटनवाढीच्या रोपवेचे ग्रहण सोडविण्यासाठी येथील ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी प्रयत्नशील आहेत. पर्यटनवाढीच्या नावाने सरकारी योजनांचा वापर हजारो वर्षांच्या पायी पर्यटनाच्या धार्मिक परंपरा मोडीत काढून रोपवे करण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न करून केंद्र सरकारची दिशाभूल केली जात आहे असा सरळ सरळ आरोप पर्यावरण प्रेमी करीत आहेत. वृक्षसंपदेची लागवड करून पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिकांना मोठ्या प्रमाणात शाश्वत रोजगार निर्मिती करणे सहज शक्य आहे. हवेतील रोपवे मुळे येथील आदिवासी बांधवांचे विस्थापन होवून त्यांचे पारंपारिक रोजगार संपविणे दुर्देवी ठरेल. वनसंपदेचा उपयोग येथील परंपरा,आदिवासी संस्कृती जपण्यासाठी करून माता गोदेचे पावित्र्य राखण्यास मदतच होईल असे पर्यावरण प्रेमींचे मत आहे. आदिवासी,वनजमिनी गिळंकृत करून फार्म हाऊसच्या नावाने ब्रह्मगिरी पोखरला जात असतांना जनसेवकांना पर्यटनाची काळजी असेल तर ब्रह्मगिरीचा हा विश्वासघात सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा पर्यावरण प्रेमींनी सरकारला दिलेला आहे. माता गोदेच्या अस्तित्वाने,शिवशंकराच्या जटांनी, प्रभू श्रीरामांच्या बाणाने,गौतम ऋशींच्या तपाने,नाथांच्या सहवासाने पावन तपोभूमी ब्रह्मगिरी जंगलाला,अंजनेरीच्या जटायूंना वृक्षांच्या रोपांच्या रोप..वे ची अधिक गरज असल्याचे फलक घेवून याबाबत पर्यावरण प्रेमींकडून आज जनजागृती करत वृक्षसंपदेच्या रोप..वे चे आनंद आखाड्याचे स्वामी गणेशानंद सरस्वती महाराजांच्या हस्ते उघाटन करून सरकार व समाजाला ब्रह्मगिरी वृक्षरोपणाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरण प्रेमींनी ग्रामस्थांच्या रोपवे विरोधातील ठरावाचा मान ठेवून रोपवेचा नाद सोडून ब्रह्मगिरी संवर्धनाचा ध्यास घेण्याचा इशारा शासन प्रशासनास दिला. या प्रसंगी मेटघर ग्रामस्थ, हरित ब्रह्मगिरीचे ललित लोहगावकर, कैलास देशमुख, प्रकाश दिवे, जयंत दानी,जीवन इ.सदस्य व नाशिक मधील विविध संस्थांचे डॉ.संदीप भानोसे,भारतीताई जाधव,कुलदीप कौर,निशिकांत पगारे,योगेश बर्वे,जगबीर सिंग,मनीष बाविस्कर इ. प्रतिनिधी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!