युरीया खताच्या खरेदीसाठी इतर औषधांची सक्ती, यामुळे शेतकऱ्याची होणारी लूट थांबवावी अन्यथा

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

युरीया खताच्या खरेदीसाठी इतर औषधांची सक्ती शेतकऱ्यांना करुन लूट केली जात आहे. याची गंभीर दखल घेवून संबंधीतांवर तातडीने कारवाई करून केंद्र व राज्य सरकारची बदनामी थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली. औषधांची सक्ती न थांबल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिष्ट मंडळाच्या वतीने देण्यात आला.

सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पेरणीची कामं सुरु आहेत. हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने खताची उपलब्धता करुन दिलेली आहे. मात्र युरीया खताची खरेदी करताना संगमनेर शेतकी सहकारी संघातून तसेच काही दुकानदार आवश्यक नसलेल्या औषधांची सक्ती शेतकऱ्यांवर करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची एकप्रकारे लूट होत असल्याची भावना व्यक्त होत असून,औषध घेतले तरच युरीया खत मिळेल असे सांगण्यात येते.युरीया खत सरकारने उपलब्ध करून न दिल्याचा संभ्रम निर्माण करून दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून निदर्शनास आणून दिल्या आहेत.

किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने आज प्रांताधिकारी शैलेश हिंगे तसेच उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन सादर केले. शेतकी सहकारी संघ तसेच काही दुकानांमधून युरीया खत हवे असल्यास जाणिवपूर्वक इतरही औषधं खरेदी करण्याची सक्ती करुन एक प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. वास्तविक खताची उपलब्धता असतानाही शेतकऱ्यांना खत उपलब्ध करुन न देणे ही एकप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक असून, केंद्र आणि राज्य सरकारलाच बदनाम करण्यासारखे आहे. या घटनेची प्रशासनाने गंभिर दखल घेवून शेतकऱ्यांवर होणाऱ्या औषधांची सक्ती तातडीने थांबवावी अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रविंद्र थोरात, अमोल खताळ, अशोक कानवडे, रोहिदास साबळे, संजय मोरे, संदीप क्षिरसागर, अशोक नन्नवरे, सुयोग गुंजाळ, संदेश देशमुख संजय पावसे यांच्यासह शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!