दंडकारण्य अभियानामुळे पर्यावरण संवर्धन वाढले – आमदार थोरात
18 व्या वर्षाच्या अभियानाचा शुभारंभ
संगमनेर / लोकवेध live न्यूज
थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. तालुक्यात जागा असेल तेथे वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे असून या दंडकारण्य अभियानामुळे पर्यावरण संवर्धन वाढले असल्याचे गोरोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
पिंपळगाव कोझीरा येथील काळा खडक येथील डोंगरावर जयहिंद लोकचळवळ व अमृतवाहिनी उद्योग समूहाच्या विद्यमाने आयोजित दंडकारण्य अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, प्रकल्प प्रमुख सौ.दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, शंकरराव पा.खेमनर ,संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, संतोष हासे, राजेंद्र चकोर, ॲड.नानासाहेब शिंदे, विष्णुपंत रहाटळ, अजय फटांगरे, सौ.अर्चनाताई बालोडे,श्रीमती ललिताताई दिघे, प्रा बाबा खरात,शिवाजी जगताप, लक्ष्मण खेमनर, कचरू फड, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी, किरण कानवडे, उपविभागीय वनअधिकारी श्री.पाटील, वनक्षेत्र आधिकारी सागर केदार,बादशहा वाळुंज, बापूसाहेब करपे, संतोष करपे, दशरथ वर्पे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांनी सुरू केलेले पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य अभियान हे राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे. झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून त्यांनी हे वृक्षारोपणाचे मिशन सर्वांना दिले. मागील सतरा वर्षात उघड्या बोडके डोंगर हिरवीगार दिसू लागले असून यावर्षीही जेथे जागा असेल तेथे झाडे लावा. वृक्ष संवर्धन संस्कृती आपल्या तालुक्यात वाढली आहे. वृक्ष जपणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य असून वनराई असेल तर जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी निर्माण होईल असेही ते म्हणाले.
माजी आमदार डॉ.सुधीर तांबे म्हणाले की वयाच्या 84 व्या वर्षी थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी पर्यावरणाची ही चळवळ आपल्या तालुक्याला दिली आहे. यामध्ये तालुक्यातील अबाल वृद्धांसह सर्वांनी सहभाग घेतला आहे.पर्यावरण ही जागतिक समस्या बनली असून त्याचे रक्षण करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे त्याकरता प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी दोन वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे तर कार्यकर्त्यांनी पाच वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन केले.
सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, हे अभियान आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे हा वृक्ष संवर्धनाचा महोत्सव असून यामध्ये सर्वांनी अत्यंत उत्साहाने भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी रमेश गुंजाळ,मीनानाथ वरपे, रोहिदास पवार ,हरिभाऊ करपे, विकास आहेर ,राधाकिसन करपे, मनोज दिवटे ,अनिल लांडगे, शिवाजी करपे, डी.एम. लांडगे आदींसह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर दीपक करपे यांनी आभार मानले.
पावसात पर्यावरण गीतांनी दिली ऊर्जा
जयहिंद लोक जागरच्या कलापथकाने प्रा. बाबा खरात,शिवाजी कांबळे,सत्यानंद कसाब, दत्तू बर्डे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धनाची विविध गीते गात विद्यार्थी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला रिमझिम बरसणारा पाऊस हिरवाईचा परिसर डोंगरांवरची झाडी यामुळे वातावरण फुलून गेले होते.

