अनेक संप्रदाय आले अन गेले मात्र वारकरी संप्रदाय टिकला – ह.भ.प. राजेंद्र महाराज सदगीर,

कळस / लोकवेध live न्यूज 

अनेक संप्रदाय आले अन गेले मात्र वारकरी संप्रदाय टिकला कारण वारकरी संप्रदाया मध्ये जातीभेद केला जात नाही. अठरापगड जाती एकत्र करून वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली आहे असे मत ह.भ.प. राजेंद्र महाराज सदगीर, कोंभाळणे यांनी प्रथम दिवसाची कीर्तन पुष्प गुंफताना व्यक्त केले.
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा ||
करी पापा निर्मूळ ||
या जगदगुरु तुकाराम महाराज यांचे अभंगावर निरूपण करताना सदगीर महाराज अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील कळस येथे गणेश उत्सवात ऋषिपंचमी ते वामन जयंती या पावन पर्व काळात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मध्ये बोलते होते.
यावेळी हभप दिपक महाराज देशमुख, मृदंगाचार्य ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, संकेत महाराज आरोटे, गायकवृंद अरुण महाराज शिर्के, रविदास महाराज जगदाळे, प्रवीण महाराज पांडे, हार्मोनियम वादक सूर्यकांत ढगे, विणेकरी गंगा बाबा वाकचौरे हे उपस्थित होते.
सदगीर महाराज बोलताना म्हणाले की, मनुष्याने जीवनात नाम जप करावे, वारकरी संप्रदायाचा नाम मंत्र अतिशय सोपा असून हे मंत्र केव्हाही कोठेही अन कधीही जपले तरी चालतो. सत्य बोलणे हे वाचिक तप आहे. सत्य बोलणे हा धर्म आहे. मानवा ने पुण्य कमवले पाहिजे.
शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने हरी नामाचा गजर करून शुभेच्छा दिल्या. ह.भ.प.कु. संस्कृती ताई वाकचौरे कळस यांनी प्रवचन सेवा केली. श्री. भाऊसाहेब बाळकृष्ण वाकचौरे व दादाभाऊ महादू वाकचौरे यांनी संतपंगत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!