युवकांनी व्यसन व जातीधर्माला थारा देऊ नये – प्रा कांगणे

[लोणीत रमाईबाई आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन]

राहाता / लोकवेध live न्यूज 

आजच्या काळात आपल्या पोटाचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देताना तरुणांनी व्यसने व जाती धर्माला थारा देऊ नये व संविधानाला अपेक्षित असा समाज घडविण्याचे आवाहन स्वामी विवेकानंद करियर अकॅडमी, परभणीचे संचालक व वक्ते प्रा.विठ्ठल कांगणे यांनी केले.

तालुक्यातील लोणी येथे सकल बहुजन समाज यांच्या वतीने त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने प्रा. विठ्ठल कांगणे यांचा ‘ भारतीय संविधान आणि युवक ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते,प्रसंगी ते बोलत होते. संविधानाचे महत्व समजावून सांगताना आपले अधिकार, स्वातंत्र्य आणि बंधुता अबाधित ठेवण्याची जबाबदारी आजच्या तरुणाईवर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रगतीच्या मार्गावर आपण चालण्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

आजचा तरुण व्यसन,धर्म -जाती ,राजकारण,समाज माध्यामात गुरफटला असल्याने समाजाची मोठी हानी होत असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,रमाबाई आंबेडकर आदी महापुरुषांनी दाखवलेल्या स्वाभिमानाच्या मार्गावर चालत असताना आपण कुणाचे गुलाम होणार नाहीत याची काळजी तरुणांनी घ्यावी,असा सल्लाही त्यांनी दिला.बाबासाहेबांसारखी उंची गाठायची असेल तर रमाई सारखा त्याग करण्याची तयारी असावी लागते,हे त्यांनी ठणकावून सांगितले.यावेळी व्यवस्थेच्या अनास्थेने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना संपवण्याचा घाट घातला असल्याचे सांगत त्यांनी भरती प्रक्रियेवरून शासनावर हल्लाबोल केला.
तरुणांनी केलेल्या आयोजनाचा गौरव करताना आपण शासनात मोक्याच्या जागा घ्याव्यात,ही भावना त्यांनी व्यक्त केली.प्रसंगी लोणी ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच, सदस्य, पं.स. सदस्य, अनेक समजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी,तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!