रामकथेतून संस्कार, बंधुभाव आणि राष्ट्रएकतेचा संदेश; रामराव ढोक महाराजांचे प्रभावी निरूपण
रामायण म्हणजे जीवनाचा आरसा; प्रत्येक प्रश्नाचे उत्तर रामकथेत : रामराव ढोक महाराज
संगमनेर (प्रतिनिधी)
“रामायण माहीत नाही असा माणूस अखंड भारतवर्षात शोधूनही सापडणार नाही. रामकथा ही केवळ ऐतिहासिक घटना नसून प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाचा आरसा आहे. जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर रामायणात दडलेले आहे. देशाची अखंडता टिकवायची असेल तर प्रथम घरात, कुटुंबात, गावात आणि समाजात एकी निर्माण झाली पाहिजे,” असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांनी केले.
अधिक मासानिमित्त आयोजित प.पू. स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या आठव्या पर्वात सुरू असलेल्या रामकथेच्या पहिल्या दिवसाच्या निरूपणात त्यांनी रामायणातील जीवनमूल्यांचा प्रभावी उलगडा केला. आपल्या रसाळ आणि ओघवत्या वाणीतून त्यांनी भक्ती, संस्कार, कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक ऐक्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.
गोवर्धन पर्वत उचलताना भगवान श्रीकृष्णाला प्रत्येक गोपसवंगड्याच्या काठीची जशी साथ लाभली, त्याचप्रमाणे सप्ताह सोहळ्याच्या यशामागे प्रत्येक भाविकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी सामूहिक सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले.
रामायणातील बंधुप्रेमाचा आदर्श उपस्थितांसमोर ठेवताना ते म्हणाले की, आज समाजाला सर्वाधिक गरज आहे ती भावा-भावांमधील प्रेम, आपुलकी आणि विश्वासाची. ज्या घरात बंधुभाव आणि एकोप्याचे वातावरण असते, त्या घरातील आई-वडिलांना कोणत्याही औषधाची गरज भासत नाही. त्यांच्या या विचारांनी भाविकांच्या मनाला स्पर्श केला.
रामचरितमानसाचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की, गोस्वामी तुळशीदासांनी रचले म्हणून ते तुलसीरामायण झाले आणि रामाचे चरित्र असल्याने ते रामचरितमानस म्हणून ओळखले जाते. जसे मानसरोवरात स्नान केल्यानंतर मन प्रसन्न होते, तसेच संतवाणीच्या सहवासातून जीवनात संस्कार, भक्ती आणि सद्विचारांची वृद्धी होते.
यावेळी त्यांनी शिव-पार्वती विवाहाची कथा अत्यंत प्रभावी शैलीत उलगडली. “पद वाईट नसते, पण पदाचा अहंकार वाईट असतो,” असे सांगत दक्ष प्रजापतीच्या कथेद्वारे त्यांनी आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. त्याग, समर्पण, कौटुंबिक नात्यांचे महत्त्व आणि कुटुंबव्यवस्थेतील स्त्रीची भूमिका यावरही त्यांनी सखोल विवेचन केले.
करपात्री महाराज आणि डोंगरे महाराज यांच्या साधेपणाचा उल्लेख करताना संतांचे खरे वैभव त्यांच्या नम्रतेत आणि आचरणात असते, असा संदेश त्यांनी दिला. तसेच पती-पत्नींनी एकत्र बसून कथा श्रवण केल्यास कुटुंबातील नाती अधिक दृढ होतात, असेही त्यांनी सांगितले.
कथेदरम्यान वीरभद्र, कार्तिकस्वामी आणि श्रीगणेश जन्मकथांचा संदर्भ देत शिव-पार्वती विवाह प्रसंगाचे त्यांनी आपल्या अमोघ वाणीने जिवंत चित्र उभे केले. रामकथेच्या माध्यमातून धार्मिकतेसोबतच सामाजिक ऐक्य, बंधुभाव, कुटुंबवत्सलता आणि संस्कारांचा संदेश देणारा हा सोहळा भाविकांसाठी आत्मपरीक्षण आणि प्रेरणेचा अनमोल अनुभव ठरला.
संगमनेर शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या रामकथेचा लाभ घेत आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतली.
