▪️ महंत गगनगिरींचा महिमा अजरामर राहील
▪️अध्यात्म सांगणे सोपे, जगणे कठीण : नंदकुमार पोवार
{ गगनगिरी महाराजांचे अखंड नामस्मरण }
संगमनेर
अध्यात्म सांगणे सोपे असते, परंतु ते आचरणात आणून जगणे अत्यंत कठीण असते. अध्यात्माला बदनाम करू नका. जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसेच मानवाचे जीवन अध्यात्माशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते माजी सरपंच नंदकुमार पोवार ( गगनबावडा ) यांनी केले.
स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गगनगिरी महाराजांच्या तपश्चर्येचा, त्यागाचा आणि लोककल्याणकारी कार्याचा भावपूर्ण वेध घेत उपस्थित भाविकांना प्रबोधन केले.
पोवार म्हणाले की, गगनगिरी महाराजांच्या सान्निध्यात येताच प्रत्येक आत्मा पावन होतो. कृतज्ञता व्यक्त करताना कधीही कमीपणा वाटून घेऊ नका. महाराजांनी आयुष्यभर ऊन, वारा, पाऊस झेलत कठोर साधना केली. अन्न पाण्याची पर्वा न करता त्यांनी आत्मोन्नतीचा मार्ग स्वीकारला. वन्य प्राणी आणि श्वापदांनाही त्यांनी आपुलकीने सांभाळले.
गगनगिरी महाराज हे जन्मजात ईश्वरी अवतारातील योगी होते. त्यांनी विविध ठिकाणी कठोर तपश्चर्या करत अध्यात्माचे सामर्थ्य जगासमोर ठेवले. दक्षिण भारतातील साधना, महालक्ष्मीचे आशीर्वाद आणि ईश्वरप्राप्तीसाठी केलेली अष्टांग योगसाधना यांचा उल्लेख करत पोवार यांनी महाराजांच्या अलौकिक जीवनकार्याचा उहापोह केला.
आजच्या काळात बुवा बाबांचे पेव फुटले असले तरी खरे संत समाजाला दिशा देणारे असतात. गगनगिरी महाराजांनी लोकांंतातून एकांताचा मार्ग स्वीकारून आत्मसाधना केल्याचे त्यांनी नमूद केले.
नगर जिल्ह्यात भक्तीचे बीज रोवून हरिनामाचा जागर घडविण्याचे कार्य गगनगिरी महाराजांच्या कृपेने घडत आहे. हा सप्ताह सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजप्रबोधनाचा आणि अध्यात्मिक उन्नतीचा एक ईश्वरी मेळावा असल्याचे पोवार यांनी सांगितले.
व्याख्याना नंतर जयवंत महाराज पाटील ( राधानगरी ) यांचे कीर्तन झाले. सकाळी आठ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ घेण्यात आला.
