भाजपच्या संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुखपदी अमोल खताळ-पाटील
संगमनेर :लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
संजय गांधी निराधार योजनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अमोल खताळ-पाटील यांची पक्षाच्या संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी (दि.०९) शिर्डी येथे झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते खताळ-पाटील यांनी नियुक्तीपत्र स्वीकारले.
शिर्डी येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार सदाशिव लोखंडे आमदार आशिष देशमुख, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, धनराज विसपुते, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गोंदकर, सरचिटणीस नितिन दिनकर, नितीन कापसे, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे यांसह उत्तर अहमदनगर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुखसाठी अनेकांनी खताळ-पाटील यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. संजय गांधी निराधार योजनेचा तसेच इतरही शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात खताळ-पाटील यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यामुळे त्यांच्या नावाला अनेकांनी समर्थन दिले. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझी निवड झाली असून पक्षाची ध्येय, धोरणे तळागाळात पोहचविण्याचा माझा प्रयत्न असेल तसेच नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून मी कटिबद्ध आहे. असे खताळ-पाटील यांनी सांगितले. त्यांच्या निवडीचे महसूलमंत्री विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष लंघे, महायुतीमधील विविध घटक पक्षांचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कौतूक केले.
