शौर्य, श्रद्धा आणि इतिहासाचा संगम — ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ मोहिमेस राज्यभरातून शिवभक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद
‘शिवराष्ट्र भूषण’ पुरस्काराने संगमनेरच्या संतोष शेळके यांचा गौरव
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शिवप्रेम, इतिहासाची ओळख आणि बलिदानाच्या स्मृती जपणारी ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ ही ३३ वी राज्यस्तरीय मोहीम शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र यांच्यावतीने अत्यंत उत्साहात संपन्न झाली. नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीदिनी आयोजित या मोहिमेस राज्यभरातून तब्बल ५५० पेक्षा अधिक शिवभक्त, तर संगमनेर परिसरातून ७० हून अधिक तरुण शिवप्रेमी सहभागी झाले होते.
शौर्याच्या या यात्रेस पन्हाळगडावरून सुरुवात झाली. नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यांचे पूजन करून मोहिमेला श्रद्धेने प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, खासदार धर्यशील माने, उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवराष्ट्र संस्थापक प्रशांत साळुंके, आणि शिवचरित्र व्याख्याते प्रा. दीपकराव कर्पे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
पहिल्या मुक्कामी खोतवाडी येथे ‘पावनखिंड’ लघुपटाचे प्रदर्शन झाले. त्यानंतर प्रा. कर्पे यांनी बाजीप्रभूंच्या बलिदानाची थरारक शौर्यगाथा उलगडणारे व्याख्यान दिले. डोंगरदऱ्या, जंगल, ओढे आणि नाले पार करत पांढरपाणी येथे छत्रपती शिवरायांच्या पालखीची मिरवणूक घेऊन पावनखिंड गाठली गेली. विशेष म्हणजे नरवीर रायाजी बंदल यांचे वंशज अनिकेत बांदल सपत्नीक या मिरवणुकीत सहभागी झाले आणि अनवाणी पावले चालत शिवपालखीला खांदा दिला.
पावनखिंडच्या पवित्र भूमीवर पूजन सोहळा पार पडला. मोहिमेतील सातत्यपूर्ण सहभाग, शिवकार्यातील योगदान व सामाजिक भान जपत कार्य करणाऱ्या संगमनेरच्या संतोष शेळके यांना ‘शिवराष्ट्र भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तसेच युवाव्याख्याते भूपाल शेळके यांनी इतिहास आणि भूगोलाची सांगड घालत प्रभावी भाषण सादर केले. या मोहिमेत डॉ. महादेव अरगडे, प्राचार्य बाळासाहेब आहेर, अॅड. महेश थोरात, प्रा. सोमनाथ गडाख, सागर कोळगे, पंढरीनाथ घुले, भाऊसाहेब नागरे, गोरक्ष हासे, पोलीस पाटील दत्तू इल्हे, आबा फटांगरे, डॉ. रवी साबळे, सुभाष घनदाट यांच्यासह शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर राहणे यांनी प्रभावीपणे केले.
ही मोहीम केवळ इतिहासाचा अभ्यास नाही तर छत्रपतींच्या विचारांची नव्या पिढीला दिलेली उजळणी ठरली.
