निसर्ग संवर्धनाची नवी दिशा: पोखरी हवेलीत तालुक्यातील पहिला पाच गुंठ्याचा  मियावाकी वृक्षलागवड प्रकल्प”

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

पर्यावरण रक्षण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पोखरी हवेली (ता. संगमनेर) येथील ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील पहिल्या पाच गुंठ्यांच्या ‘मियावाकी पद्धतीच्या वृक्ष लागवड प्रकल्पाचे’ उद्घाटन नुकतेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या हस्ते संपन्न झाले. हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आला आहे.

या प्रसंगी कृषी अधिकारी वाळीबा उघडे, अजित पावसे, ग्रामपंचायत सरपंच सुदाम खैरे, उपसरपंच सोमनाथ थिटमे, ग्रामसेविका अनिता माळी, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि नरेगाचे मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्पांतर्गत विशाल वृक्ष १५०, मोठे वृक्ष ५९२, मध्यम वृक्ष ३६० आणि लहान झाडे ४०० अशा प्रकारे नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्यात आले. राजेंद्र ठाकूर (सहाय्यक गटविकास अधिकारी) व मदन शेवाळे (कृषी विस्तार अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली ही लागवड शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन ट्रॅक्टर शेणखताची व्यवस्था करण्यात आली, यामुळे लोकसहभागाचे सुंदर उदाहरण साकारले गेले.

गावात रोजगार हमी योजनेतून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात असून त्यात बांबू लागवड, बिहार पॅटर्न वृक्षारोपण, रस्ता दुतर्फा वृक्षलागवड, बायोगॅस प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फळबाग लागवड, जिल्हा परिषद शाळेत सेंद्रिय परसबाग आणि जलतारा योजना यांचा समावेश आहे. त्यामुळे गावातील अनेक मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

अफार्म सेवाभावी संस्था देखील गावात पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत असून त्याचा सकारात्मक परिणाम गावकऱ्यांच्या जीवनावर होत आहे.

या संपूर्ण उपक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि नरेगाचे मजूर यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

पोखरी हवेली ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!